मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने हजेरी नोंदवण्याच्या उपक्रमाला गेल्यावर्षी सुरूवात झाली. परंतु सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून नियमित आढावा न घेतल्याने शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून ऑनलाईन हजेरी नोंदविण्याच्या उपक्रमाची नियमित अंमलबजावणी होत नसल्याचे उघडकीस आले आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधील विविध प्रकारच्या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून शिक्षकांना वारंवार सूचनावजा आदेश देण्यात येतात. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे पुन्हा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परीषदेकडून लक्ष वेधले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेऊन सर्व शाळांमध्ये १०० टक्के विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंदविली जाईल याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परीषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या समग्र शिक्षा अंतर्गत विद्या समीक्षा केंद्राद्वारे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी नोंदविण्याच्या उपक्रमाला १ डिसेंबर २०२३ पासून सुरूवात झाली. या उपक्रमात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच, अनुदानित शाळांना ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवायची आहे. त्यानुसार शाळांमधील शिक्षकांनी विद्या समिक्षा केंद्राच्या स्विफ्टचॅट या ॲप्लिकेशनमधील बॉटव्दारे विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे गरजेचे आहे. या प्रयोगामुळे वर्गात प्रत्यक्षात किती विद्यार्थी उपस्थित असतात, याची माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय, या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ करण्यात येणार आहे.