नवी दिल्ली : बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की “गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळा”. ते म्हणाले, “सरकारने बनवलेल्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश आहे. परंतु, सनातन धर्मात गायीला मोठी प्रतिष्ठा आहे. गायीला आम्ही माता म्हणून पूजतो. त्यामुळे गायीला जनावर म्हणणं चुकीचं आहे”. अविमुक्तेश्वरानंद यांनी गौ प्रतिष्ठा ध्वज स्थपना यात्रेचं आयोजन केलं आहे. ही यात्रा नुकतीच ओडिशात दाखल झाली आहे. यावेळी त्यांनी गायीला जनावरांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली. स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “गायीला संरक्षण मिळवून देणे व गायींची सेवा करणे हा या यात्रेचा उद्देश आहे”. ओडिशात दाखल झाल्यावर अविमुक्तेश्वरानंद यांनी तिथल्या प्रसिद्ध लिंगराज मंदिरात जाऊन पूजा केली, तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी येथे गौ प्रतिष्ठा ध्वज प्रतिष्ठापना यात्रेसाठी आलो आहे. गोमातेचं सरंक्षण व संवर्धनासाठी सरकारने कायदा करावा, ही आमच्या या यात्रेची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीच आम्ही ही यात्रा काढली आहे.
सरकारच्या यादीत गायीला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. परंतु, भारतीय सभ्यता व संस्कृतीत गायीला देवी म्हटलं गेलं आहे. गायीला माता म्हणत तिचं महत्त्व सांगितलं आहे. सनातन धर्म मानणारे गायीला माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणं हा सनातन धर्माचा, सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपण पुढे न्यायला हवी. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने जारी केलेल्या जनावरांच्या यादीतून गायीला वगळावं लागणार आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, “गोमातेचं सरंक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने कायदा केल्यानंतर लोकांनाही याचं व सनातन धर्माचं गांभीर्य समजेल. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची पद्धत, गायीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल”. स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे गेल्या अनेक वर्षांपासून गायींचं संरक्षण व संवर्धन करण्यासाठी काम करत आहेत. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन लोकांना प्रेरित केलं आहे. त्यांचं काम अजूनही चालूच आहे. केंद्र सरकार कायदा करत नाही तोवर हे काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.