मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. सहार विमानतळाने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर संबंधित परिसरात पोलिससांनी शोध मोहीम राबविली. पण पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
साकीनाका पोलिसांच्या हद्दीत हजरत जय्यब जलाल (गैबन शाह दर्गा) मशिदीजवळ ड्रोन आढळल्याची माहिती खासगी सुरक्षा रक्षकाकडून देण्यात आली. तो ड्रोन काही काळाने जवळच्या परिसरातील झोपडपट्टीमध्ये गेला. सहार विमानतळाने शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ स्थानिक साकीनाका पोलिसांना सतर्क करण्यात आले. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला संबंधित ड्रोनचे चित्रीकरण करण्यास सांगण्यात आले तसेच पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली. विशेष करून येथील झोपडपट्टी परिसरात ड्रोन आढळला होता. तसेच संबंधित ड्रोनबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दोन पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकाच्या माध्यमातून परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. साकीनाका परिसरातील नागरिकाने ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्याचे पोलिसांना कळवले. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता त्या ठिकाणी काहीच सापडले नाही. साकिनाका विभागात विमानतळ परिसर असून अति संवेदनशील विभाग म्हणून साकीनाकाकडे पाहिले जाते. त्यामुळे नेहमीच सतर्क असलेले पोलीस आणि सीआयएसएफ यांनी ही शक्यता फेटाळून लावलेली आहे. तरीसुद्धा मुंबई पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







