मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत संततधार सुरू असलेला पाऊस आजपासून ओसरणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात पुढील काही दिवस कोरडे वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेले दोन दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला होता. यामुळे मुंबईच्या तापमानातही घट झाली. मात्र, आजपासून मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात हलक्या सरी होतील. परंतु वादळी वाऱ्यांची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. शहरात पावसाची शक्यता १० टक्क्यांपेक्षा कमी असून, आकाश प्रामुख्याने अंशतः ढगाळ किंवा निरभ्र राहील. काही भागांत आर्द्रतेचा परिणाम जाणवू शकतो, मात्र जोरदार सरींची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुंबई परिसरात कमी दमट आणि तुलनेने उष्ण वातावरण जाणवण्याची शक्यता आहे.







