कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या १ ऑक्टोबरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेअंतर्गत तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाचा पहिला वार्षिक स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार पडला. आपल्या शाळेतून शिक्षणाची शिदोरी घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळण्याची ही एक संस्कारपूर्ण आणि सांस्कृतिक परंपरा असल्याचे या मेळाव्याद्वारे स्पष्ट झाले.
शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे म्हणाले की, शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडणीचे केंद्र असते. शाळेतून मिळालेले ज्ञान, मूल्ये आणि संस्कार याच आधारावर विद्यार्थ्यांचा पुढील जीवनप्रवास उभा राहतो. समाजकारण, प्रशासन, राजकारण, संशोधन, व्यापार, उद्योग, शेती यांसह विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ही शाळेच्या गुणवत्तेचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, भारत बोरनारे स्वतः कडोमनपा शाळा तिसगाव आणि डोंबिवली येथील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी दोन्ही शाळांच्या स्नेह मेळाव्यास स्वतः हजेरी लावली.







