वृत्तसंस्था : १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषक २०२६ चं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेळापत्रक जाहीर केला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही, हा एक मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडत, आयसीसीने यावेळी भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटात ठेवलं आहे, ज्यामुळे गट टप्प्यात संघ एकमेकांशी भिडताना दिसणार नाहीत.
गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान सामने स्थगित करण्याची अनेकदा मागणी झाली आहे. असं असूनही बऱ्याचशा चर्चांनंतर आशिया चषक २०२५ खेळवण्यात आला आणि भारतीय संघाने तीन वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. तर महिलांच्या आयसीसी वनडे विश्वचषकातही भारत-पाक सामना झाला. पण १९ वर्षांखालील विश्वचषकात आयसीसीने दोन्ही संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.







