वृत्तसंस्था : लहान मुलांना सोशल मीडियाची अतिरेकी सवय लागत असून, ऑस्ट्रेलिया सरकारने यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय येण्याच्या आधीच मेटाने १६ वर्षाखालील मुलांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ डिसेंबरला इन्स्टाग्राम आणि फेसबुक असलेले सगळे अकाऊंट बंद होणार आहेत.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने या निर्णयाची घोषणा केली आहे. मेटाने २० नोव्हेंबर रोजी याबद्दल माहिती दिली. ऑस्ट्रेलिया सरकार लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी कायदा लागू करण्याच्या तयारीत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. १० डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्सची खाती बंद करण्याचा कायदा लागू केला जाणार आहे. जर या कंपन्यांनी १६ वर्षाखालील मुलांची खाती हटवली नाही, तर त्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. १६ वर्षाखाली मुलांचे अकाऊंट हटवण्याबद्दल मेटाने म्हटले आहे की, बंदी लागू होण्यापूर्वीच मेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून अकाऊंट हटवण्यास सुरूवात करणार आहे. आजपासून मेटा १३ ते १५ वर्ष वयोगटातील यूजर्संना आम्ही सूचना देण्यास सुरूवात करणार आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड्सवरील वापर या यूजर्संना करता येणार नाही.







