नवी दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आहे. महायुतीला एकतर्फी बहुमत मिळाले असून लवकरच सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाणार आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री भाजपचा असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणत्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार याबाबत उत्सुकता कायम आहे. यावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार व एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यापूर्वी अजित पवार यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. दिल्लीमध्ये राज्याचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांचा पक्ष संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आमचा राष्ट्रवादी पक्ष हा आता राष्ट्रीय पक्ष होणार आहे. आमचा आधीपासून आहे मात्र आता ह्यापुढे संपूर्ण देशामध्ये आम्ही पक्षाचा प्रचार व प्रसार करणार आहोत. देशभरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पहिल्यांदा आम्ही दिल्लीच्या निवडणुकीमध्ये सामील होणार आहे. तसेच वेगवगेळ्या राज्यांमध्ये जशा निवडणूका होतील तसे आम्ही त्या लढणार आहोत. जो आम्ही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा घालवला होता. तो आम्ही लवकरात लवकर परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे.
दिल्लीमध्ये महायुतीची मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत महत्त्वाची बैठक होत आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमच्या तिन्ही पक्षाचे काही सहकारी असे एकत्रितपणे बैठक करणार आहोत. चर्चा करुन महाराष्ट्राची सर्वांत मोठी जबाबदारी असलेले सरकार तयार करण्याबाबत निर्णय घेणार आहे. पुढे कशाप्रकारे कार्य केले जाईल याबाबत चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ कसे असेल आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कसे असतील याबाबत चर्चा होणार आहे. या चर्चेमधून अंतिम निर्णय घेण्यात येतील,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पुढे अजित पवार म्हणाले की, “राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं हे आपलं पहिलं ध्येय होतं. आमचं हे ध्येय आम्ही यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे आणि मंत्रिमंडळ कसे असेल याची चर्चा आज होईलच. कोणी कोणतं खातं मागतयं असं काही नाही. आमचं सरकार येणं हेच आमचं ध्येय होतं. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही पुढची बोलणी केली जाणार आहे. खातेवाटप, पालकमंत्रीपदं, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांची निवड यासंदर्भात निर्णय घेतला जाईल,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.