मुंबई : एकीकडे राजधानी दिल्लीतील वायू प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुंबईमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी मुंबईमधील वाढत्या हवा प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या समाजमाध्यमावर शहरातील काही प्रदूषित भागांची छायाचित्र टाकून ‘व्हॉट वी आर ब्रिदींग’ असा सवाल मुंबईकर करीत आहेत. मागील अनेक दिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मुंबईतील हवेची ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती. तर काही भागात दररोज हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. यावर सध्या समाजमाध्यमावर अनेकजण व्यक्त होत आहेत. मुंबईतील हवा फारशी चांगली नाही. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे ट्विट अनेक नागरिकांनी ‘एक्स’वर केले आहे. याला जबाबदार कोण, आपल्या शहराला काय झाले आहे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान, या हवेमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागला आहे. घसा खवखवणे, सर्दी, ताप ही प्रमुख लक्षणे जाणवत असून सततच्या प्रदूषित हवेमुळे हृदयविकार असलेल्यांना श्वसनास त्रास होऊ शकतो. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक धोका पाच वर्षांखालील मुले आणि वृद्ध व्यक्तींना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर प्रदूषित हवेमुळे गर्भावर परिणामही होऊ शकतो. दरम्यान, गेले अनेक दिवस मुंबईतील ठराविक भागातील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वांद्रे – कुर्ला संकुल, भायखळा, शिवडी, कुलाबा, शिवाजीनगर या परिसरांचा समावेश आहे.