पिंपरी : क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये सामना जिंकून दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर पोलीस गणवेशात मुलाखत दिल्याने निलंबित झालेले फौजदार सोमनाथ झेंडे यांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला आहे. कर्तव्यावर जायचे नसल्याने झेंडे पहाटे सहा वाजताच व्यायमशाळेत जाऊन दोन तास व्यायाम करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सोमनाथ झेंडे हे कार्यरत होते. झेंडे यांनी ड्रीम ११ वर विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती. त्यांचा संघ (टीम) जिंकला. त्यामुळे त्यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. कर्तव्यावर हजर असताना गेम खेळणे आणि जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा दावा करत काही जणांनी झेंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. परंतु, ड्रीम ११ या ऑनलाइन खेळावर भारतात बंदी नाही. सन २००८ पासून हे उपयोजन सुरू आहे. ड्रीम ११ विश्वचषकाचे भागीदार आहे. भारतीय खेळाडूंच्या गणवेशावर त्याचे चित्र (लोगो) आहे.
एकप्रकारे खेळाडूंकडून त्याची जाहिरातच केली जाते. मग, झेंडे यांच्यावर कारवाई कशासाठी केली जात आहे, असा सवाल काही जणांकडून उपस्थित करण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर गणवेशात मुलाखत देणे, पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणे, गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १८ ऑक्टोबर रोजी झेंडेंचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले. आता निलंबनानंतर झेंडे यांनी स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला. कामावर जायचे नसल्याने ते दररोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करत आहेत. पहाटे सहा ते आठ दोन तास शरीरासाठी देत आहेत. त्यासाठी महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. सोमनाथ झेंडे यांनी १० ऑक्टोबर रोजी दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. परंतु, बक्षिसाचे पैसे अद्यापही त्यांना मिळाले नाहीत. पुढील १२ दिवसांत पैसे मिळण्याची शक्यता आहे. दीड कोटीवर ३० टक्के कर लागणार आहे. दरम्यान, पैसे मिळण्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली.
निलंबनामुळे वेळ असल्याने शरीरयष्टी तयार करण्यावर भर दिला आहे. दररोज दोन तास व्यायाम करतो. निलंबनावर मला काही बोलायचे नाही. विभागीय चौकशी सुरू आहे. -सोमनाथ झेंडे, निलंबित फौजदार