मुंबई : मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर चेंबूरमधील एका २४ वर्षीय तरुणाने दीड वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. तब्बल दीड वर्षांनंतर पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाची मैत्रीण आणि तिच्या वडिलांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूरमधील पांजरापोळ परिसरात वास्तव्यास असलेल्या महेश लालवानी (२४) या तरूणाची परिसरातील एका तरुणीसोबत मैत्री होती. मात्र अचानक या दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणाने घराच्या गच्चीवर आत्महत्या केली. महेशने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मैत्रिणीला अनेक वेळा फोन केले होते. मात्र तिच्याकडून त्याला प्रतिसाद न मिळल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा सर्व घटनाक्रम गच्चीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. याचदरम्यान मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणाची माहिती महेशच्या वडीलांना मिळाली. मात्र या भांडणाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तरुणीच्या वडिलांनी गायब केले होते. महेशच्या वडिलांनी याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची देखल घेऊन पोलिसांनी दीड वर्षांनंतर महेशची मैत्रिण आणि तिच्या वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.