मुंबई : टिंडर या डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीनंतर सहाय्यक दिग्दर्शकाचे नग्नावस्थेत चित्रीकरण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अनोळखी महिलेसह इतरांवर खंडणी, फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. वेब सिरिजमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीची १३ डिसेंबर रोजी टिंडर ॲपवर एका महिलेसोबत ओळख झाली. दोघांनी आपले मोबाइल क्रमांक एकमेकांना दिले. त्यानंतर या महिलेने सहाय्यक दिग्दर्शकाला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी महिला अश्लील चाळे करीत होती. तिने सहाय्यक दिग्दर्शकालाही कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर त्याचे चित्रीकरण केले. या प्रकारानंतर तक्रारदाराला तीन मोबाइल क्रमांकांवरून व्हॉट्स ॲपवर संदेश प्राप्त झाले. त्यांनी एका चित्रफीत सहाय्यक दिग्दर्शकाला पाठवली होती. त्यात त्याचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आरोपींनी त्याला धमकावण्यास सुरूवात केली. ७५ हजार रुपये खंडणी दिली नाही, तर चित्रफीत इंटरनेटवर वायरल करण्याची धमकी त्याला देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या सहाय्यक दिग्दर्शकाने असे काही करू नये, अशी विनंती केली. आरोपींनी धमकावल्यानंतर सहाय्यक दिग्दर्शकाने १५ डिसेंबर रोजी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर ३५ हजार रुपये जमा केले. त्यानंतरही आरोपी पैशांची मागणी करीतच होते.
अखेर त्याने हा प्रकार एका परिचीत व्यक्तीला सांगितला. परिचीत व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला त्याला दिला. त्यानुसार सहाय्यक दिग्दर्शकाने याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेसह इतरांविरूद्ध खंडणी, फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सहाय्यक दिग्दर्शकाने रक्कम जमा केलेल्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मागवली असून त्याद्वारे तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.