पुणे : शहरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका रॅकेटने तीन विद्यार्थ्यांची २२ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला. याबाबत वेल्हे येथील एका २० वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ सुनील कोडग (वय २२, रा. जमीलनगर, मुंबई) आणि संतोष काशिनाथ पवार (वय ५०, रा. विरार, मुंबई) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला एका वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्याची आरोपी कोडग आणि पवार यांच्याशी ओळख झाली. आरोपींनी त्यांचा शैक्षणिक संस्थेशी कोणताही संबंध नसताना फिर्यादीकडून १३ लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला प्रवेश मिळाल्याचे बनावट पत्र दिले. त्यानंतर आरोपींनी एका तरुणीसह दोघांना हडपसर येथील एका आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेशाचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून आठ लाख ९० हजार रुपये उकळले. महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने फिर्यादीने आरोपींकडे पैसे परत मागितले. परंतु आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.