ठाणे : नववर्षाच्या स्वागताला अकरा दिवस बाकी असतानाच गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने ठाणे पूर्वेकडून एका परदेशी नागरिकाला अटक करत त्याच्याकडून १२ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे ३१ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. नायजेरियन देशाचा पासपोर्ट, व्हिसाची प्रत आणि मोबाइल देखील हस्तगत करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. नववर्ष स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जाते. आरोपीने या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणले होते का? याचा तपास गुन्हे शाखा करत असली तरी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ठाणे पोलिस करडी नजर ठेऊन आहे.
ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (३३) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो नायजेरियन देशाचा नागरिक असल्याची माहिती वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. ठाणे पूर्वेकडील आनंदनगर चेकनाका येथील बस पार्किंगजवळ एक नायजेरियन नागरिक कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती घोडके यांना मंगळवारी मिळाली होती. या माहितीनंतर सायंकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ओकोरी याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून ३१ ग्रॅम कोकेन हस्तगत केले. य़ा कोकोनची किंमत १२ लाख ४० हजार आहे. नालासोपारा येथे वास्तव्यास असलेला ओकोरी याने त्याच्या साथीदाराकडून कोकेन घेऊन ठाण्यात विक्रीसाठी आल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपी हा कोकेन कोणाला विक्री करणार होता याची चौकशी पोलिस करीत आहेत. मात्र, नववर्ष स्वागताला केवळ अकरा दिवस शिल्लक असले तरी ठाण्यात मिळालेल्या लाखो रुपयांच्या अमली पदार्थांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत.





