मुंबई : दिवाळीनिमित्त नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपासून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कांदिवली पश्चिमेकडील धानुकावाडी येथील मेसर्स गुलाब फूड प्रोडक्ट्स या आस्थापनेवर छापा घालण्यात आला. या छाप्यामध्ये सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला.
दिवाळीमध्ये मिठाईला प्रचंड मागणी असते. ही संधी साधून मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व दिवाळी आंनदात व उत्साहात साजरी व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात येत आहेत. कांदिवली (प.) येथील धानुकावाडी परिसरातील रेणुका नगरमधील जय भारत सोसायटीतील मेसर्स गुलाब फूड प्रोडक्ट्स या आस्थापनेवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दुकानातील निकृष्ट दर्जाचा मावा अस्वच्छ आणि सामान्य तापमानाला साठवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे या दुकानामधील ३ लाख ५९ हजार ६०० रुपये किंमतीचा ८९९ किलो मावा जप्त करण्यात आला. तसेच दुकानामधील रोझ बर्फी, मलाई बर्फी आणि माव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र आढाव आणि सहाय्यक आयुक्त पी. ए. विशे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी टी. बी. घुमरे आणि एस. एस. खांडेकर यांनी ही कारवाई केली.