नवी मुंबई : कंत्राटदाराने दिलेले पैसे परत न केल्याने नवी मुंबईतील एका ४४ वर्षीय वास्तुविशारदने तुर्भे एमआयडीसी परिसरातील हॉटेल जवळ पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दिलेले पैसे परत न मिळाल्यामुळे मनात राग धरून आरोपीने विदेशी बनावटीच्या पिस्तुलमधून हवेत एक राऊंडचा गोळीबार केला. या घटनेबाबत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीसह रिव्हॉल्व्हर आणि पंधरा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वारंवार मागणी करूनही उसने पैसे मिळत नसल्याने हवेत गोळी झाडल्याची घटना तुर्भे एमआयडीसी भागात घडली . यातील आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पुण्यात राहणारे नितीन भोसले यांचे तुर्भे एमआयडीसीत एक हॉटेल असून सदर हॉटेल डोंबिवलीतील रवीश शेट्टी यांना चालवण्यास दिली होते. मात्र, काही कारणांनी सदर हॉटेल अन्य व्यक्तीला चालवण्यास दिले. यादरम्यान भोसले यांनी शेट्टी यांना पाच लाख रुपये उसने दिले होते. ते वारंवार मागणी करूनही पैसे परत दिले जात नव्हते. दोघांची भेट तुर्भे एमआयडीसीतील कुंभनाथ एंटरप्राइजेस येथे झाली. त्यावेळी पैशांचा विषय निघाला असता शेट्टी यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली.
त्यामुळे तु पैसे परत देत नाही आता मी काय करू असे म्हणत परवाना असलेले पिस्तूल बाहेर काढून एक गोळी हवेत झाडली. ही माहिती कळताच तुर्भे पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने घडलेली सर्व हकीकत सांगून पैसे उसने घेतल्याचा पुरावाही सादर केला. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिले. या प्रकरणी ५० हजार रुपये किमतीचे विदेशी बनावटीचे पिस्तुल, ७ एम एम चे १५ जिवंत काडतूसे, झाडलेल्या गोळीची पितळी पुंगळी, आणि आरोपीचा शस्त्र परवाना जप्त केला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.