मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत परदेशी चलनासह दोन प्रवाशांना अटक केली. आरोपी परदेशी चलन घेऊन सिंगापूरला जात होते, पण त्यापूर्वीच डीआरआयने त्यांना अटक केली. अब्दुल वहाब सय्यद नैना मोहम्मद व मोहदूम परिया थंबी शाहउल हमीद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अब्दुलकडून ७७ लाख ४९ हजार रुपये किमतीचे परदेशी चलन, तर मोहदूमकडून ६९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही चेन्नईत एका व्यक्तीने परदेशी चलन असलेल्या बॅगा दिल्या होत्या. त्या त्यांना सिंगापूर येथे जाऊन एका व्यक्तीला द्यायच्या होत्या. त्यासाठी ते दोघेही चेन्नईवरून बंगळुरू येथे गेले. बंगळुरू येथून मुंबई व तेथून ते सिंगापूरला जाणार होते. त्यावेळी तपासणीत त्यांच्याकडील बॅगांमध्ये परदेशी चलन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांनाही अटक करून त्यांच्याविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडे मिळून एक कोटी ४७ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. चौकशीत दोघांनाही सिंगापूरला परदेशी चलन नेण्यासाठी कमिशन मिळणार होती. ही रक्कम सिंगापूर येथील व्यक्ती त्यांना देणार होती. पण त्यापूर्वी त्यांना अटक झाली. दोघेही चेन्नई येथील रहिवासी असून या तस्करी मागे हवाला रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याबाबत डीआरआय अधिक तपास करत आहे.