पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षकांमार्फत करण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यांत होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी, तर दुसरी ७ मे, तर तिसरी तपासणी ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात सभागृह क्रमांक ३, चौथा मजला, बी विंग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे खर्च तपासणी करण्यात येणार आहे. पहिली तपासणी २ मे रोजी, दुसरी तपासणी ६ मे आणि तिसरी तपासणी १० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी ३ मे रोजी, दुसरी तपासणी ७ मे आणि तिसरी तपासणी ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे.