मुंबई : लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच नियुक्ती झाली असून मंडळाचे नवनियुक्त कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी संस्थेत ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले आहे. हा घोटाळा संस्थेने केलेल्या न्यायवैद्यक आर्थिक लेखापरीक्षणद्वारे (फॉरेन्सिक फायनानशियल ऑडिट) समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार, नवनियुक्त मंडळाने कायदेशीर आणि सल्लागार शुल्काचे लेखापरिक्षण केले. त्यात १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम वकील आणि सल्लागारांवर अवाजवीपणे खर्च केल्याचे दिसून आले. त्यांनी वैयक्तिक कायदेशीर समस्यांसाठी तसेच त्यांच्या वकील आणि सल्लागारांना पैसे देण्यासाठी या निधीचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. माजी उपाध्यक्ष अजय पांडे आणि त्यांचे मुख्य सल्लागार, डॉ. लक्ष्मी नारायणन यांनी कायदेशीर शुल्कासाठी हा निधी वळवल्याचे मान्य केले आणि धर्मादाय आयुक्तांना पुरावे दाखवले. करोनामध्ये न्यायालये बंद असतानाही सुमारे १०.७५ कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.
ट्रस्टच्या निधीचा वापर विजय मेहता आणि निकेत मेहता यांनी चुकीच्या पद्धतीने केला, त्यांनी बनावट कंपन्यांना पैसे दिल्याचे समोर आले. यामध्ये एम.एस. वेस्टा आणि एम एस. मेफेअर रिअल्टर्स प्रा. लि. यांना वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याच्या नावाखाली पैसे दिल्याचे दाखविले. या कंपन्या मात्र प्रत्यक्षात आरोग्यसेवेशी संबंधित नसून रिअल इस्टेट विभागात कार्यरत होत्या. १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आगाऊ रक्कम देऊनही रुग्णालयाला अपेक्षित असलेली कोणतीही वैद्यकीय उपकरणे आजवर मिळाली नसल्याची माहिती प्रशांत मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.