रायगड : गर्भवती महिलेचा खून करून गेली २४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. नेरळ पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथून अटक केली. ही घटना २ फेब्रुवारी २००१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास कर्जत तालुक्यातील कळंब गावातील पोही येथे घडली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. २४ वर्ष पोलीसांच्या हातावर तूरी देत तो फिरत होता. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तपासावर प्रलंबित या गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश नेरळ पोलीसांना दिले होते. यानंतर पोलीस सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी या गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरू केला.
या गुन्ह्यातील फिर्यादी आणि आरोपी संतोष राणे हे सख्ये भाऊ होते. आरोपी कुठलाही काम धंदा करत नव्हता. यावरून फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांच्याशी वाद होत होते. २ फेब्रवारी २००१ रोजी फिर्यादी हे वीट भट्टीवर काम करून, बाजारातून मच्छी खरेदी परतत होते. यावेळी आरोपी हा त्यांच्या पत्नी सोबत शुल्लक कारणाने भांडण करत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या आईने आरोपी यांची समजूत काढून घरात पाठवले. या गोष्टीचा राग आल्याने आरोपी संतोष याला प्रचंड राग आला. त्याने घरातून कुऱ्हाड आणून फिर्यादी यांची मयत पत्नी तिच्यावर मानेवर, दंडावर आणि हातवर वार केले. या हल्ल्यात गर्भवती असलेल्या फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर आरोपी संतोष हा फरार झाला होता. गेली २४ वर्ष त्याचा शोध लागू शकलेला नव्हता. त्यामुळेपोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. तांत्रिक तपास करून पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा तो पिंपरी चिंचवड येथे एका कँटरर्सकडे काम करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे गेली २४ वर्ष पोलीसांच्या हातावर तुरी देत फिरणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात आला. त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक या प्रकरणाचा पूढील तपास करत आहेत.







