पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून दोन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्याचे नियोजन आहे. पुढील दोन वर्षे प्रत्येकी दोन याप्रमाणे चार परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच टीईटीसह परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त आधारप्रमाणित पद्धती, उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधाही दिली जाणार आहे. परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (२३ नोव्हेंबर) राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी माहिती दिली. परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक उपस्थित होत्या. टीईटी परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २ लाख ३ हजार ३३४ उमेदवारांनी पेपर १साठी, तर २लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर २साठी नोंदणी केली आहे.
या परीक्षेत मराठी माध्यमाचे उमेदवार सर्वाधिक आहेत. मराठीसाठी ३ लाख २७ हजार १३५, इंग्रजीतून २८ हजार ४३७, उर्दू माध्यमातून २५ हजार ९३५, हिंदी माध्यमातून ९२ हजार ४२०, बंगाली माध्यमातून १६८, कन्नड माध्यमातून १ हजार ४६८, तेलुगू माध्यमातून ३०, गुजराती माध्यमातून ७५ आणि सिंधी माध्यमातून एका उमेदवाराने नोंदणी केली आहे. तसेच राज्यातून ५ हजार २८३ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तसेच ४११ दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्यात आला आहे. माजी सैनिक असलेले ४५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी, बायोमेट्रिक, फेस रेकग्निशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही कॅमेरा, फोटो व्ह्यू, कनेक्ट व्ह्यू अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांग, माजी सैनिक उमेदवारांची पडताळणी करण्यात आली. बोगस उमेदवारांना प्रतिबंध करण्यासाठी पुढील परीक्षेपासून आधारप्रमाणित पद्धती लागू केली जाणार आहे. तसेच वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे.







