वसई : पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये अवैध जाहिराती लावणाऱ्या टोळीवर मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सुरक्षा दल पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नायगाव रेल्वे स्थानकातून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर त्याच्याकडून ६० हजार पोस्टर जप्त करण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये प्रेम विवाह, वशीकरण, स्वस्त घरे आणि तत्सम भ्रामक संदेश देणारी पत्रके मोठ्या संख्येने आढळून येतात. या पत्रकांमुळे लोकल गाड्यांचे विद्रुपीकरण तर होतेच. मात्र, प्रवाशांचीही यामुळे दिशाभूल होते. रेल्वे पोलिसांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही काही टोळ्यांकडून ही अशी पत्रके लोकलमध्ये चिकटवली जातात. तर वसई विरार शहरातही अलीकडे अवैध जाहिराती लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सोमवारी मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सुरक्षा दल पथकाने केलेल्या एका कारवाईत अवैध जाहिराती लावणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले. सोमवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी नायगाव स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमध्ये काहीजण जाहिराती लावत होते. यावेळी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सुरक्षा दल पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोईसर येथे राहणाऱ्या अभिषेक पांडे (२५), धर्मराज पांडे (२७) या दोघांना तर नालासोपारा येथे राहणाऱ्या ऋतिक कलवर (२३), अमित प्रजापती (२२), रितेश बिश्नोई (वय ३२) या तिघांना अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.







