पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच लाख रुपयांची लाच मागून एकाकडून तडजोडीत ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील उपनिरीक्षकासह एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रात्री अटक केली. एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय ३५, रा. शासकीय पोलीस वसाहत, परमारनगर, वानवडी), ॲड. राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१, रा. चित्रदुर्ग अपार्टमेंट, कोथरुड) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखळ करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक न करणे, तसेच तपासात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार तरुणाने तडजोडीत पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये देण्याचे मान्य करून तक्रार दिली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून चव्हाण यांच्यासाठी लाच घेणारे वकील ॲड.फुलसुंदर यांना सोमवारी रात्री पकडले. चौकशीत चव्हाण यांच्यासाठी लाच घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस शिपाई तावरे, डावखर, कदम यांनी ही कारवाई केली.