मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने राज्यातील पात्र नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ अधिक वेगाने मिळावा यासाठी २२ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष शिधापत्रिका शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेद्वारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध इष्टांकाच्या मर्यादेत नव्याने शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. शासनाचे विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘एकही पात्र लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये’ हा मुख्य उद्देश समोर ठेवून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पात्र लाभार्थ्यांचा तातडीने समावेश करून त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर विशेष शिबिरे भरविण्यात येणार आहेत. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त इष्टांकाची जिल्हानिहाय पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेनुसार उपलब्ध इष्टांकाचा प्रभावी वापर करून पात्र लाभार्थ्यांना नव्याने शिधापत्रिका देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांना जलद गतीने सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे, त्यांची तात्काळ पडताळणी करणे, पात्रता निश्चित करणे तसेच संबंधित जिल्ह्याला उपलब्ध असलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत नवीन शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शिधापत्रिका मिळण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून, उपलब्ध इष्टांकाचा प्रभावी आणि पारदर्शक वापर होण्यास मदत होईल. तसेच शासनाच्या अन्नसुरक्षा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत अधिक जलद आणि प्रभावीपणे पोहोचविण्याचा उद्देश साध्य होणार आहे. विशेष शिबिरांमध्ये अर्ज स्वीकारण्यापासून ते पात्रतेची पडताळणी आणि शिधापत्रिका मंजुरीपर्यंतची प्रक्रिया शक्य तितक्या कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक पात्र नागरिकांना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेशन कार्डसंदर्भातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व पात्र नागरिकांना या विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवावा, असे त्यांनी म्हटले आहे.






