पंढरपूर : आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. यंदा सुमारे १५ लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून त्यानुसार सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या काळात चंद्रभागा नदीत स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्याची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. या धार्मिक परंपरेसोबतच अनेक भाविक चंद्रभागा नदीत नौकाविहाराचाही आनंद घेतात. ही वाढती गरज लक्षात घेऊन प्रशासनाने चंद्रभागा नदीपात्रात तब्बल २०० होड्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या असून त्यांच्यासोबत अनुभवी नावाडीही सज्ज आहेत. या होड्यांचा उपयोग भाविकांना नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी केला जातो. तसेच इस्कॉन मंदिर घाट आणि गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही या होड्या महत्त्वाची वाहतूक व्यवस्था ठरत आहेत. भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व होडीचालकांना आवश्यक परवानग्या दिल्या असून प्रत्येक होडीत कमाल २० भाविकांनाच प्रवास करण्याची स्पष्ट अट घालण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक होडीत लाइफ जॅकेटची व्यवस्था, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आणि अनुभवी नावाड्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. वारीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवली जात असून नदी परिसरात आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे.
चंद्रभागेतील हा नौकाविहार केवळ भाविकांसाठी सोयीचा ठरत नाही, तर स्थानिक नावाडी कुटुंबांच्या उपजीविकेचाही महत्त्वाचा आधार आहे. वारीच्या काळात हजारो भाविक या सेवेचा लाभ घेत असल्यामुळे स्थानिक नावाड्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक उत्पन्न मिळते. सहा पिढ्यांपासून नौकाविहाराचा व्यवसाय करणारे नावाडी सोमनाथ अभंगराव यांनी सांगितले की, हा व्यवसाय केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून विठ्ठल भक्तांच्या सेवेशी जोडलेली परंपरा आहे. अनेक वेळा पूरस्थिती किंवा नदीत अडचणीत सापडलेल्या भाविकांचे प्राण वाचवण्याचे कार्यही नावाड्यांनी केले असून ही सेवाही ते तितक्याच जबाबदारीने पार पाडतात. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात वर्षभर पुरेसे पाणी राहावे, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नावाड्यांनी केली आहे. भविष्यात नदीकाठावर मोठे घाट, कॉरिडॉर किंवा इतर विकासकामे उभारली गेल्यास पारंपरिक नौकाविहार व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. तरीही भाविकांची सेवा, सुरक्षित प्रवास आणि वारीची परंपरा अखंड ठेवण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत नावाडीही पूर्ण तयारीने सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात भाविकांना सुरक्षित, नियोजनबद्ध आणि आनंददायी नौकाविहाराचा अनुभव मिळत असून प्रशासन आणि स्थानिक नावाडे यांच्या समन्वयातून पंढरपुरातील वारी अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.






