पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. दरवर्षी आकर्षक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ट्रस्टने यंदा भक्तांसाठी एक वेगळे आध्यात्मिक आकर्षण निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या भव्य सजावटीच्या कामाचा शुभारंभ सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील सजावट विभागात कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत या देखाव्याची माहिती दिली. आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, वृंदावनमधील प्रेम मंदिर हे आपल्या पांढऱ्या संगमरवरी वास्तुकलेसाठी, भव्य स्तंभांसाठी, प्रकाशमय घुमटांसाठी आणि भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांच्या दर्शनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर पुण्यात उभारण्यात येणारी ही प्रतिकृती सुमारे १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात ती भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या प्रतिकृतीमध्ये उत्तर भारतीय मंदिर वास्तुशैलीचे सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळणार असून रासलीला, गोवर्धन लीला, झुला लीला यांसारख्या श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे शिल्पपट साकारले जाणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक सजावट आणि शोभिवंत फुलांच्या रचनेमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाने उजळून निघणार आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रेम, भक्ती, श्रद्धा, एकात्मता आणि सलोखा या मानवतेला जोडणाऱ्या मूल्यांचा संदेश या देखाव्यातून देण्यात येणार आहे. बुधवार चौकात भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार असून मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना कृष्णलीलेतील विविध प्रसंग जिवंत स्वरूपात साकारले जातील. तसेच दर्शनी भागात राधा-कृष्णांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सव २०२६ दरम्यान देश-विदेशातून पुण्यात येणाऱ्या लाखो भाविकांना वृंदावनच्या प्रेम मंदिराचे वैभव अनुभवण्याची संधी मिळणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







