मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन घटक जीवनातला अविभाज्य असलेल्या वाहतूककोंडीला लवकरच रामराम केला जाणार आहे. अमेरिका आणि युरोपच्या धर्तीवर मुंबईतही वाहनांसाठी मल्टिमोडल बोगद्यांचे (बहुउद्देशीय भूमिगत वाहतूक व्यवस्था) जाळे निर्माण केले जाणार आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून सहा महिन्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. भूमिगत वाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी महापालिकेने अंदाजित चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा अहवाल तयार केला आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या विचारात घेत, प्रवासात सुलभता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीयमानकाच्या अनुषंगाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी बहुउद्देशीय भूमिगत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने महापालिका नियोजन करत असून त्यानुसार सागरी किनारा मार्ग, पूर्वमुक्त मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि इतर महत्वाचे मार्ग हे भूमिगत बोगद्यांशी जोडले जाणार आहेत. जेणेकरून बोगद्यांतून वाहने थेट त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील. योजनेनुसार ज्या वाहनांना मुंबईबाहेर यावे लागेल त्यांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.







