मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नवी सोशल मीडिया आचारसंहिता लागू केली असून, महामंडळाची प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ किंवा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. नव्या नियमांनुसार चालक, वाहक तसेच सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना रील्स, व्हिडिओ किंवा इतर सोशल मीडिया सामग्री तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहन चालवताना रील्स, शॉर्ट्स किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये गणवेश परिधान करून व्हिडिओ तयार करण्यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच महामंडळाची गोपनीय माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करता येणार नाहीत. सकारात्मक किंवा प्रचारात्मक व्हिडिओ तयार करण्यासाठीही सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महामंडळाने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल आणि त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे, प्रवासी सुविधा, स्वच्छता, रस्ता सुरक्षा, लोककल्याणकारी योजना आणि महामंडळाच्या विविध उपक्रमांचा सकारात्मक प्रसार करण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यांच्याशी समन्वय साधून महामंडळाच्या अधिकृत माहितीचा प्रसार करण्यासाठी आवश्यकतेनुसार विभागीय स्तरावर संवाद बैठका आयोजित केल्या जातील. या माध्यमातून विविध योजना, उपक्रम आणि जनहिताच्या मोहिमांची नियमित माहिती उपलब्ध करून देत अधिकृत व जबाबदार पद्धतीने प्रचार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.






