मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने अत्याधुनिक आयपी-आधारित एलईडी व्हिडिओ डिस्प्ले प्रणाली सुरू केली आहे. या नव्या डिजिटल प्रणालीमुळे प्रवाशांना गाड्यांची माहिती अधिक वेगाने, अचूक आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवासी हॉलसह विविध ठिकाणी मोठ्या एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या असून, त्यावर पुढील चार तासांत स्थानकावर येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. मुख्य हॉलमध्ये बसविलेल्या मोठ्या एलईडी स्क्रीनवर एकाच वेळी १२ ओळींमध्ये गाड्यांची माहिती प्रदर्शित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्क्रीनवर गाडीचा क्रमांक, नाव, आगमन व प्रस्थानाची वेळ तसेच संबंधित प्लॅटफॉर्म क्रमांक स्पष्टपणे दिसणार असल्याने प्रवाशांना वेगवेगळ्या चौकशी केंद्रांवर किंवा सूचना फलकांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. परिणामी, स्थानकातील गर्दीत योग्य प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
या आधुनिक प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम (NTES) शी थेट जोडण्यात आली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांची सद्यस्थिती दर पाच मिनिटांनी आपोआप अद्ययावत होत राहणार असून, गाडी वेळेवर आहे की उशिराने धावत आहे, याची रिअल-टाइम माहिती प्रवाशांना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी हाय-टेक आयपी-आधारित ट्रेन-ऑल-इन-वन व्हिडिओ डिस्प्ले प्रणाली वापरण्यात आली असून, त्यामध्ये २.५ मिमी आणि ५ मिमी पिक्सेल पिचचे उच्च क्षमतेचे एलईडी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लांब अंतरावरूनही माहिती स्पष्टपणे वाचता येते. याशिवाय या स्क्रीनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये मजकूर, ग्राफिक्स तसेच महत्त्वाचे माहितीपर व्हिडिओही प्रदर्शित केले जाणार आहेत. प्रवाशांना आवश्यक माहिती एकाच ठिकाणी आणि योग्य वेळी उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने केलेला हा उपक्रम प्रवासी सुविधांमध्ये महत्त्वाची भर ठरणार असून, स्थानकावरील माहिती व्यवस्थापन अधिक आधुनिक, प्रभावी आणि प्रवासी-केंद्रित बनण्यास मदत होणार आहे.






