मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्रात ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्याचा सामूहिक निर्धार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी येथील डोममध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, समितीच्या अशासकीय सदस्य सपना श्रॉफ तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय तज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित आहे. भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करत असताना युवा शक्तीला ड्रग्सच्या विळख्यात अडकवून देशाला आतून कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ड्रग्स हे या छुप्या युद्धातील सर्वात धोकादायक शस्त्र असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने या संकटाविरोधात स्वतःची जबाबदारी ओळखून लढा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ड्रग्सची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत, “ड्रग्सला नाही” असा ठाम निर्धार केल्यास कोणालाही त्यांना व्यसनाधीन बनवता येणार नाही, असे सांगितले. पुढील दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचे डोळे आणि कान असल्याचे सांगत, व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या व्यक्तींबाबत किंवा अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविषयी माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार असून, ‘ड्रग फ्री कॅम्पस’ आणि ‘ड्रग फ्री स्कूल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास शासन पूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्सविषयी उपयुक्त माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि अशा नागरिकांना पुरस्कारही दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर शासन भर देणार असल्याचे सांगत, वयाच्या २१ ते २२ वर्षांपर्यंत युवक व्यसनांपासून दूर राहिल्यास आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत युवा शक्ती ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरक शक्ती ठरावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने ‘ड्रग फ्री मुंबई’ची शपथ प्रत्यक्ष कृतीत उतरवून अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करत उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.





