मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ आणि अखंड करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अंधेरी पश्चिम–मंडाले (मानखुर्द) मेट्रो २ ब मार्गिकेवरील वांद्रे पश्चिम मेट्रो स्थानक थेट वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ४०.९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पुलाची लांबी २७८ मीटर असेल. या कामाचे कंत्राट अंतिम करण्यात आले असून नियुक्त कंत्राटदार आर. के. माधानी अँड कंपनी यांना स्वीकृतीपत्रही देण्यात आले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून काम सुरू झाल्यानंतर १८ महिन्यांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर मेट्रो आणि उपनगरी रेल्वे यांच्यातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांना मेट्रो स्थानकातून थेट रेल्वे स्थानकात तसेच रेल्वेतून मेट्रो स्थानकात सहज पोहोचता येणार असल्याने वेळेची बचत होण्याबरोबरच वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. एमएमआरडीएने मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आणि अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांबरोबरच बस आगार, व्यावसायिक संकुले आणि निवासी परिसरांना पादचारी पुलांद्वारे जोडण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार कार्यान्वित तसेच बांधकामाधीन मेट्रो मार्गिकांवरील शक्य तितकी स्थानके रेल्वे स्थानकांशी जोडण्याचे काम सुरू आहे.
वांद्रे पश्चिम मेट्रो स्थानकाला रेल्वे स्थानकाशी जोडण्याच्या या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत आर. के. माधानी अँड कंपनी, एबी इन्फ्राबिल्ड, साई प्रोजेक्ट्स यांच्यासह एकूण सात कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. आर्थिक निविदेत सर्वात कमी दर देत आर. के. माधानी अँड कंपनीने हे कंत्राट मिळवले. स्वीकृतीपत्र दिल्यानंतर आता प्रत्यक्ष बांधकामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम मेट्रो स्थानक हे मेट्रो २ ब मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचे स्थानक असून हा टप्पा २०२८-२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो आणि उपनगरी रेल्वे दरम्यान कोणत्याही अतिरिक्त रस्ते ओलांडण्याची गरज भासणार नाही. पादचारी पुलामुळे दोन्ही स्थानकांदरम्यान सुरक्षित, जलद आणि अखंड संपर्क निर्माण होईल. तसेच भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून हा प्रकल्प तयार करण्यात येत असून, मुंबईतील बहुपर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






