मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, उपाहारगृहे, मिठाईची दुकाने, बेकरी आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मुंढे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे पालन करणाऱ्यांना चिंता करण्याचे कारण नसले तरी नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. यासाठी स्वयंपाकघराच्या स्वच्छतेपासून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत विविध बाबींसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई. दंडात्मक उपाययोजनांसह परवाना निलंबित किंवा रद्द होऊ शकतो. गंभीर उल्लंघन आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यातील खाद्यव्यवसाय अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार बनवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
हॉटेलच्या स्वयंपाकघरासाठी महत्त्वाचे नियम :
- स्वच्छता आणि बांधकाम
- भिंती आणि जमिनीवर धुण्यायोग्य फरशा असणे आवश्यक.
- फरशांमधून पाणी झिरपू नये.
- स्वयंपाकघरात पुरेशी हवा खेळती राहावी.
- धूर बाहेर जाण्यासाठी योग्य यंत्रणा असणे बंधनकारक.
- अन्नसाठवणूक व्यवस्था
- कच्चा माल आणि तयार अन्नासाठी स्वतंत्र विभाग असावेत.
- कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवता येणार नाही.
- शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे ठेवणे आवश्यक.
- कीटक नियंत्रण
- माशा नियंत्रित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधने बसवावीत.
- नियमित कीटकनियंत्रण प्रक्रिया करणे आवश्यक.
- किडे, झुरळे, पाल किंवा उंदरांचा प्रादुर्भाव आढळता कामा नये.
ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा
- स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असावे.
- हात धुण्यासाठी द्रवसाबण आणि स्वच्छता सुविधा ठेवाव्यात.
- आवश्यकतेनुसार स्वच्छ टॉवेलची व्यवस्था असावी.
मोफत पिण्याच्या पाण्याबाबत नवा नियम
- ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक.
- ग्राहकांच्या टेबलावर विनाकारण बाटलीबंद पाणी ठेवू नये.
- ग्राहकाने मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी देण्यात यावे.







