वृत्तसंस्था : घरात अवघ्या १७ दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण होते. भारतीय लष्करातील ३० वर्षीय ग्रेनेडियर सुनील कुमार नुकतेच वडील झाले होते आणि या आनंदासाठी ते सुट्टीवर घरी आले होते. कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी नवजात बाळाला पाहण्यासाठी घरी येत होते. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरवले होते. २९ मे २०२६ रोजी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनील कुमार यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर जयपूरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
जवानाच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. सोमवारी त्यांचे पार्थिव जयपूरहून झुंझुन येथे आणण्यात आले. झुंझुन ते इंडाली गावापर्यंत सुमारे १४ किलोमीटरची भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. हजारो ग्रामस्थांनी हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘ग्रेनेडियर सुनील कुमार अमर रहे’च्या घोषणा दिल्या. गावातील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून पुष्पवृष्टी करत या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला. सर्वाधिक हृदयद्रावक क्षण तेव्हा पाहायला मिळाला, जेव्हा सुनील कुमार यांचे पार्थिव घरी पोहोचले. हातात १७ दिवसांचे बाळ घेऊन पत्नी रिंकू देवी शेवटच्या दर्शनासाठी पुढे आल्या. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. नवजात बाळाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याची वेदना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. आई कमला देवी आणि वडील रघुवीर सिंह यांचे दुःखही अनावर झाले. अखेरीस गावातील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्याच्या तुकडीने गार्ड ऑफ ऑनर देत शस्त्र झुकवून वीर जवानाला मानवंदना दिली.






