नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी ‘EPFO 3.0’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रमावर काम करत आहे. या नव्या प्रणालीमुळे भविष्य निर्वाह निधी (PF) काढणे, हस्तांतरित करणे आणि विविध सेवा वापरणे अधिक सोपे व जलद होणार आहे. सध्या पीएफ काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रक्रियात्मक अडथळे दूर करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. नव्या व्यवस्थेनुसार सदस्यांना UPI आणि UPI-सक्षम ATM च्या माध्यमातून थेट त्यांच्या पीएफ निधीपर्यंत पोहोचता येणार असून, पात्र रक्कम आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात थेट जमा केली जाऊ शकणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या सेवेची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती दिली असून, ती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अधिकृत लॉन्च तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
EPFO 3.0 अंतर्गत सदस्यांना त्यांच्या EPF खात्यातील ५० ते ७५ टक्के रक्कम UPI किंवा ATM द्वारे काढण्याची सुविधा मिळू शकते. मात्र, नियमानुसार किमान २५ टक्के निधी खात्यात कायम ठेवणे आवश्यक असेल. व्यवहार पूर्ण करण्यासाठी UPI पिनचा वापर करावा लागेल. याशिवाय EPFO ने ऑटो-सेटलमेंट मर्यादा १ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे घर खरेदी, शिक्षण, विवाह किंवा वैद्यकीय उपचारांसारख्या गरजांसाठी निधी तीन दिवसांच्या आत उपलब्ध होऊ शकतो. नव्या प्रणालीत सदस्यांना फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN सक्रिय करणे, पासबुक पाहणे, माहिती दुरुस्त करणे, ऑनलाइन क्लेम सादर करणे आणि आधार लिंकिंगशी संबंधित सुधारणा करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे ATM मधून PF काढण्याच्या सुविधेचा पेन्शन फंडावर कोणताही परिणाम होणार नाही. ही सुविधा केवळ EPF शिल्लक रकमेसाठी लागू असेल. सदस्यांना सर्व नवीन अपडेट्स EPFO अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध होतील.







