मुंबई : देशातील आगामी जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदा प्रथमच नागरिकांना ऑनलाइन सेल्फ-एन्यूमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाइन स्वरूपात नोंदवता येणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मेदरम्यान ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून, सध्या ही प्रक्रिया काही निवडक भागांमध्ये सुरू करण्यात आली आहे. विशेषतः दिल्लीतील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येत आहे. या प्रक्रियेमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच चुकीची माहिती नोंदवली जाण्याची शक्यता कमी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जनगणना विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. विशेष म्हणजे, केवळ घरमालकच नव्हे तर भाडेकरू नागरिकांनाही स्वतःची माहिती भरता येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी नागरिकांनी अधिकृत पोर्टल ला भेट देऊन लॉगिन करावे लागेल. त्यानंतर सेक्टर निवडून कॅप्चा भरावा लागेल. पुढील टप्प्यात कुटुंबप्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे पडताळणी केली जाईल. नागरिकांना हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, उर्दूसह १६ भाषांमधून कोणतीही भाषा निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.
यानंतर नागरिकांना जिल्हा, परिसर, पिनकोड, जवळची ओळख पटणारी ठिकाणे यांसह घराचे अचूक लोकेशन नकाशावर मार्क करावे लागणार आहे. पुढील प्रश्नावलीमध्ये घराची स्थिती, खोल्यांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची माहिती तसेच पाणी, वीज, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत माहिती विचारली जाणार आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर नागरिकांना ती पुन्हा तपासण्याची तसेच आवश्यक असल्यास बदल करण्याची सुविधा उपलब्ध असेल. अंतिम सबमिशननंतर प्रत्येक अर्जदाराला ११ अंकी एसई आयडी दिला जाईल, जो पुढील पडताळणीसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. १६ मेपासून जनगणना अधिकारी घराघरात भेट देऊन माहितीची खातरजमा करतील. त्या वेळी नागरिकांनी एसई आयडी दाखवणे आवश्यक राहणार आहे. ऑनलाइन भरलेली माहिती योग्य आढळल्यास प्रक्रिया पूर्ण मानली जाईल, अन्यथा आवश्यक बदल करून माहिती पुन्हा सादर करावी लागू शकते. प्रशासनाच्या मते, डिजिटल पद्धतीमुळे जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.
ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
नागरीक se.census.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन खालीलप्रमाणे माहिती भरू शकतात:
- पोर्टलला भेट द्या : Census Self-Enumeration Portal वर जाऊन आपले राज्य निवडा.
- नोंदणी (Registration) : कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
- भाषा निवडा : आपली सोयीची भाषा निवडा (मराठीसह १६ भाषा उपलब्ध आहेत).
- स्थान निश्चित करा : डिजिटल मॅपवर आपले घर मार्क करा आणि पत्ता भरा.
- प्रश्नावली भरा : घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती अशा एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे द्या.
- सबमिट करा : माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला SE ID (Self-Enumeration ID) मिळेल.







