मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, या अत्याधुनिक प्रकल्पाने प्रवासी आणि वाहनचालकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. खोपोली ते कुसगावदरम्यान उभारण्यात आलेला हा १३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या प्रकल्पातील दोन भव्य बोगद्यांनी जगातील सर्वात रुंद बोगद्यांचा मान पटकावला असून त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच या प्रकल्पातील उन्नत केबल-स्टेड पूल हा देशातील सर्वात उंच पूल ठरला आहे. डोंगररांगा, दऱ्याखोऱ्या आणि तलावाखालून जाणारा हा मार्ग वाहनचालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गिका तातडीने सुरू करण्यात आली, तर पुणे-मुंबई मार्गिका पुढील दिवशी वाहतुकीसाठी खुली झाली.
मात्र या प्रकल्पाचे आकर्षण आता सुरक्षेची चिंता बनू लागले आहे. अनेक वाहनचालक आणि प्रवासी बोगद्यांमध्ये तसेच पुलांवर वाहने थांबवून सेल्फी, फोटो, व्हिडिओ आणि रिल्स तयार करत असल्याचे समोर आले आहे. मिसिंग लिंक हा प्रवेश-नियंत्रित आणि अतिवेगवान मार्ग असून येथे ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अचानक वाहन थांबवणे इतर वाहनांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे ठरत आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी आता अशा वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. मोटार वाहन कायद्यातील कलम १२२ आणि १७७ अंतर्गत चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करणे आणि सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करणे या कारणांवरून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ पहिल्याच दिवशी १५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनही प्रवाशांना मिसिंग लिंक पर्यटनस्थळ नसून सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात आलेला द्रुतमार्ग असल्याचे सांगत वाहन न थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







