वृत्तसंस्था : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणी जहाजे आणि बंदरांवरील नाकेबंदी हटवली नसल्याचा आरोप करत इराणने ही कठोर भूमिका घेतली आहे.
इराणच्या लष्कराच्या हवाल्याने जारी केलेल्या निवेदनात, अमेरिकेकडून युद्धविराम कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी कायम राहील, तोपर्यंत या महत्त्वाच्या जलमार्गातून होणारी वाहतूक रोखली जाईल. सध्या सामुद्रधुनी इराणी सशस्त्र दलांच्या कडक नियंत्रणाखाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के तेल या मार्गाने वाहून नेले जाते. त्यामुळे या मार्गावर निर्बंध आल्यास जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतसह अनेक देशांवर होऊ शकतो. दरम्यान, या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असून, परिणामी पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. आधीच तणावपूर्ण परिस्थितीत ही घडामोड झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






