ठाणे : वाहतूक कोंडी, वाहन बिघाड तसेच इतर अडचणींचा सामना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या कालावधीत करावा लागू नये यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिस सर्तक झाले असून त्यांनी विशेष नियोजन केले आहे. परीक्षा काळात अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरातील प्रमुख मार्गांवर ५४ रायडर्स तैनात ठेवले जाणार आहेत. ठाणे वाहतूक कार्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी यासंदर्भात माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (दहावी) परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या १ ते ५ परिमंडळांमध्ये बारावीचे १२६ तर, दहावीचे २२३ परीक्षा केंद्रे आहेत. या केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे उशीर होऊ नये, यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. परीक्षेच्या दिवशी अचानक वाहन बंद पडणे, अपघात, सिग्नलवरील कोंडी किंवा रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी वाहतूक विभागाने ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० तसेच ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक ७०३९००३८६६ उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय शहरातील १८ वाहतूक युनिटमध्येही स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक कार्यरत असणार आहेत. तरी, परिक्षेला पोहचताना रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. नियंत्रण कक्षातही तीन वाहने तैनात असणार आहेत. परिक्षाकाळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे परिक्षा कालावधीत पालकांनी तसेच नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.







