वसई : वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मदतीसाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्यांना लगेच रेल्वे पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. वसई रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच या मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वसई रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेमधील अत्यंत वर्दळीचे स्थानक आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गावांमधील तसेच शहरीपट्ट्यातील अनेक नोकरदार या स्थानकातून नोकरी निमित्त ठाणे, मुंबई परिसरात नोकरीसाठी जातात. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतमालाची विक्री करणारे शेतकरी असे हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.
पण, या वाढत्या प्रवासी गर्दीमुळे रेल्वे स्थानकात अनेक वेळा भुरटे चोर गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांच्या हातामधील, पिशवीतील मोबाईल चोरणे, पैशाचे पाकीट काढून घेऊन पळून जाणे असे प्रकार करतात. त्यामुळे नागरिकांना वसई रेल्वे पोलीस ठाण्यात यांची तक्रार नोंदवावी लागते. पण, रेल्वे पोलीस ठाणे वसई स्थानकापासून लांब असल्यामुळे अनेकदा काही तक्रारी नोंदवल्याच जात नाही. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर वसई रेल्वे स्थानकातही मदत कक्ष सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. तर याच पार्श्वभूमीवर नुकतेच वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर प्रवेशद्वाराशेजारीच मदत कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षामुळे प्रवाशांच्या शंकांचे निरसन करता येणार आहे. तसेच चोरीच्या घटनांची तक्रार नोंदवणे देखील प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे पोलिसांची मदत मिळणे सोपे होणार आहे.







