मुंबई : देशातील सायबर व डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या अर्थसुरक्षेसाठी काही विशेष उपाय योजण्याचे ठरवले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी या उपायांची माहिती दिली. विशेष म्हणजे, सायबर फसवणूक झालेल्या ग्राहकांना (आयुष्यभरात एकदाच) जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई देण्याची योजना रिझर्व्ह बँकेसमोर प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले. ‘कमी रकमेचे व्यवहार करताना झालेल्या डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित ग्राहकांना ही भरपाई देण्यात येईल’, असे मल्होत्रा यांनी सांगितले.
‘सायबर फसवणुकीमुळे गमावलेल्या रकमेच्या ८५ टक्के रक्कम अथवा २५ हजार रुपये यातील कमी रक्कम संबंधित ग्राहकास भरपाईपोटी देण्याचे प्रस्तावित आहे. ही भरपाई ग्राहकांना केवळ एकदाच मिळू शकेल’, असे मल्होत्रा यांनी सांगितले. ‘ग्राहकांनी इतरांच्या चुकांपासून शिकणे रिझर्व्ह बँकेला अभिप्रेत आहे. तरीही एखाद्या ग्राहकाची डिजिटल व्यवहारात प्रथमच फसवणूक झाल्यास त्या रकमेतील ७० टक्के रकमेची भरपाई रिझर्व्ह बँक करेल. उर्वरित ३० टक्के रकमेचा भार हा संबंधित बँक व संबंधित ग्राहक यांच्यावर समप्रमाणात असेल’, असेही मल्होत्रा यांनी नमूद केले.







