मुंबई : माघी गणेशोत्सवाला २२ जानेवारीपासून सुरुवात होत असून गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी ६ फुटांपर्यंत उंच गणेशमूर्तींचे नदी, समुद्र, तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांऐवजी महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले आहे. त्याचबरोबर रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी पाण्यात विसर्जित करू नये, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘तात्पुरता मंडप उभारणी’ परवानगीकरिता ऑफलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू केली आहे. तसेच मंडप उभारणी परवानगीसाठी १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात विविध स्तरीय नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार माघी गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने पार पडावे, यासाठी महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना व अतिरिक्त सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी), तसेच ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (सीपीसीबी) यांनी जारी केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे नद्या, समुद्र, तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये विसर्जन करू नये. मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे व भाविकांना पुन्हा एकदा केले आहे. माघी गणेशोत्सव २०२६ संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार आणि २६ ऑगस्ट २०२५ च्या परिपत्रकानुसार ६ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार (SOP) रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी घटक पाण्यात विसर्जित करण्यास बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी, तसेच भाविकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे, यासाठी महानगरपालिका गरजेनुसार कृत्रिम तलावांची उभारणी करीत आहे. एकूणच, माघी गणेशोत्सव २०२६ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळावे, यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करावे, उच्च न्यायालय, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले.







