मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव लोकातून अवतरले असून, त्यांचे धरतीवर अवतरणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रशंसोद््गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुक्रवारी काढले. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिका सारख्या बलाढ्य देशासमोर छाती ठोकून उभे आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार बर्जीस देसाई यांच्या ‘मोदीृज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशान राज्यपालांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे आदी उपस्थित होते. रूपा पब्लिकेशन द्वारे प्रकाशित या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.
यावेळी राज्यपालांनी मोदी यांच्या गेल्या २५ वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेत मोदी हे दैवी देणगी असून देशाला आपले कुटुंब मानणारा आणि या कुटुंबाच्या कल्याणासाठी सदैव झटणारा त्यांच्यासारख्या पंतप्रधान लाभणे हे देशाचे भाग्य आहे. मोदींनी आपल्या जीवनात जो आदर्श निर्माण केला आहे, ते सामान्य माणसाचे काम नाही. कारण सामान्य माणूस नेहमी दुसऱ्याने बनविलेल्या मार्गावरून चालतो. तर महापुरुष हा स्वत:चा मार्ग तयार करुन त्यावर समाजास चालण्यास सांगतो. मोदी यांनीही देशाच्या विकासाचा नवा मार्ग निर्माण करुन त्यावरुन जणतेला चालण्यास सांगितले आहे. आजवर अशक्य वाटणारे असे काश्मिरमधून कलम ३७० हटविणे, अयोध्येत राममंदिर उभारणे,रशिया- युक्रेन युद्ध थांबवून तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासारखे पराक्रम केवळ मोदीच करु शकतात असेही राज्यपाल यांनी सांगितले. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्यासमोर पंतप्रधान मोदी छाती ठोकून उभे असून रशियाकडून तेल खरेदी करण्याचा त्यांच्या निर्णही देशहिताचा आहे. पूर्वी देशाच्या पंतप्रधांनी जगात कोणी दखल घेत नव्हते. त्यांना कोपऱ्यात ढकलून दिले जात असे मात्र आज मोदींचा प्रत्येक शब्द संपूर्ण जग ऐकत असून त्यांनी जगभरात भारताची प्रचिमा उंचावल्याचेही राज्यपालांनी सांगितले.







