मसूर : हेळगाव (ता. कराड) येथील रस्त्यालगत असणाऱ्या घरात अज्ञात चोरट्यांनी महिलेला व कुटुंबातील लोकांना कोयत्याच्या धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन महिलांच्या गळ्यातील मिनी गंठण व कपाटातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांवर डल्ला मारला. जबरी चोरीचा हा प्रकार शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. चोरट्यांचा शेजारील बंद घरे फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. चोरीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. हेळगावला कराड-कोरेगाव रस्त्यालगतच्या सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घराचा किचनचा दरवाजा जोरजोरात आपटत चोरट्यांनी कडी काढून आत प्रवेश केला. त्यावेळी सुनंदा या जाग्या झाल्या. टी-शर्ट व बरमोडा घातलेला ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरट्यांनी सुनंदा सूर्यवंशी यांना कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने त्यांच्या व मुलीच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावून घेतले. दरम्यान, किचनच्या शेजारील बेडरूममधील लोखंडी कपाट ड्रॉवर उचकटून सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे डूल असा एकूण सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण अडीच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करत ऊसाच्या शेतातून पोबारा केला.
चोरट्यांनी बाजूच्या नंदा हनमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे,बाबासो जगन्नाथ पाटील, अर्जुन भिमराव सुर्यवंशी यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरीची फिर्याद सुनंदा सूर्यवंशी यांनी मसूर पोलिसात दिली आहे. तपास सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत. हेळगावमधील सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद आहेत. अनेकवेळा ग्रामसभेत याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. मात्र ग्रामपंचायतीकडून गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे चोरी प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले नाहीत. गावातील सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोपीस बनले आहेत. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे.





