वसई : वसई विरार महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे हे सुरवातीच्या पावसातच निष्फळ ठरले आहेत. अजूनही शहरात सांडपाणी वाहून येणारे नाले प्लास्टिक कचरा व अन्य कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छतेनंतरही नाल्यांची अशाच प्रकारची अवस्था असल्याने शहराला पुराचा धोका कायम आहे. वसई विरार शहरात निघणारे सांडपाणी व पावसाचे पाणी याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक नाले यासह अंतर्गत गटार व्यवस्था आहे. पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी वसई विरार महापालिकेने नुकताच शहरातील नाल्यांची सफाई केली होती. मात्र अनेक ठिकाणच्या भागात नाल्यांची योग्यरीत्या सफाई झाली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याचाच फटका शहरातील नागरिकांना अगदी सुरवातीच्या पावसात बसला आहे. शहरात विविध ठिकाणच्या नाल्यात प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, जलपर्णी यासह अन्य कचरा दिसून येत आहे.
विशेषतः नालासोपारा येथील प्रगती नगर ते मोहक सिटी पर्यंत च्या नाल्यात अशाच प्रकारे पूर्णता गाळ साचून राहिला आहे. त्यामुळे येथून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग तलावाच्या जवळ ही नाल्यातही मोठ्या प्रमाणात कचरा साचून असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत वारंवार पालिकेकडे तक्रारी करूनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच वसई पश्चिमेतील उमेळा फाटा ते डी-मार्ट दरम्यानच्या नाल्याची योग्यरित्या सफाई न झाल्यामुळे अस्वच्छ पाणी साठून नाल्यात पुन्हा एकदा शेवाळे जमा झाले आहे. तसेच वाहून येणारा कचरा नाल्यात तसाच साचून राहिल्यामुळे नाल्यातून येणारी दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या नाल्यांची पालिकेकडून वेळीच होणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात पुन्हा एकदा पाणी निचरा होण्यास अडथळे निर्माण होऊन पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ शकते असे नागरिकांनी सांगितले आहे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील नाल्यांची पाहणी करून ज्या ज्या भागांमध्ये अशा प्रकारे कचरा साचून राहिला आहे. त्याची योग्यरित्या स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.पालिकेकडून नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम सुरूच असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.







