मुंबई : मुंबईत प्रदुषण वाढतच आहे. प्रदूषण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांविरूध्द पालिकेची कारवाई सुरूच असून आतापर्यत २९५५ बांधकामांना नोटीसा पाठविल्या असून ८६८ बांधकामे थांबविण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. बांधकामांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या २५ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे अत्यंत काटेकोरपणे केले जावे. याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी वेळोवेळी दिलेले आहेत. मुंबई परिसरात सुरू असलेल्या सर्व बांधकाम व्यवसायिक, शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी प्रदूषणविषयक नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने बजावले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. शहर आणि उपनगरातील सुमारे ६ हजार बांधकामांना पालिकेने परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेचा दर्जा खालावला असल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकामांना परवानगी दिलेल्या बहुतांश साईट्सवर त्या नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे. प्रदुषण नियमावलीची पायमल्ली करणा-या ८६८ बांधकामांचे काम धांबविण्यात आले आहे. तर २९५५ बांधकामाच्या साईट्सना नोटीसा पाठविल्या असल्याची समजते. ६०३ बांधकामांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या असल्याची माहिती पालिकेने दिली. धुळीमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी ताडपत्री लावली जात नसल्याचे आढळून आले आहे. डेब्रिज टाकलेल्या २५४ प्रकरणांमध्ये १६.3 लाख रुपये दंड करण्यात असल्याची माहिती पालिकेने दिली.