नवी मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहेत. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जातंय. अनेक ठिकाणी मोठा मुद्देमालही प्रशासनाकडून जप्त करण्यात आलाय. मुंबई पोलिसांकडून आता मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ८,४७६ किलो चांदी जप्त करण्यात आलीये. इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात चांदी पाहून अधिकारी देखील चक्रावले. मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून ही चांदी जप्त केलीये. मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल ८० कोटी असल्याचे देखील सांगितले जातंय. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशी चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आलीये. पोलिस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जातंय. यावेळी एका ट्रकवर पोलिसांना संशय आला.
मग त्या ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी सापडली, अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांकडून या चांदीचे वजन केले असता ८,४७६ किलो चांदी असल्याचे स्पष्ट झाले. ही चांदी तब्बल ८० कोटींची असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून चाैकशीसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेची माहिती निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला लगेचच देण्यात आली. आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, ही चांदी अवैधरित्या वाहतूक करून निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून याप्रकरणी आता तपास केला जातोय. या चांदीचे काही योग्य कागदपत्रे आहेत की, नाही याची पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. यापूर्वीही मुंबईमध्ये चांदी सापडली होती. ज्याचा तपास सुरू आहे. पळस्पे फाटा चेक नाकावर देखील काही काही दिवसांपूर्वी ३,४९,५०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. निवडणुकीमुळे वाहण्यांची कसून तपासणी केली जातंय.