मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करताना विनातिकीट प्रवासीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महसूल बुडवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४० हजाराहून अधिक विनातिकीट प्रवासी बेस्ट तिकीट तपासणीसांच्या जाळ्यात अडकले आहेत. दररोज साधारण ८००च्या जवळपास विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात येत आहे. मोहिमेत केलेल्या दंडात्मक कारवाईतून एकूण २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या २,९४१ बसगाड्या असून यामधून दररोज ३३ ते ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टचे एसी प्रवासाचे पाच किमीपर्यंतचे तिकीट सहा रुपये आणि विनाएसीचे पाच रुपये आहे. तरीही अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करण्याचे धाडस करतात. मात्र तिकीट तपासणीच्या जाळ्यात हे प्रवासी अडकतात. अशा विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाची ही कारवाई सुरूच असून २० फेब्रुवारीपर्यंत ४०,२६० विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती उपक्रमाने दिली. यासाठी पाच हजारपेक्षा अधिक तपासण्या बेस्टच्या तिकीट तपासनीसांनी केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेले प्रवास भाडे आणि प्रवासी भाड्याच्या रक्कमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून अशी एकूण रक्कम वसूल केली जाते. दंड भरण्यास नकार दिल्यास मुंबई महापालिका अधिनियम, १८८८च्या कलम अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल, इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून २४,७०,०१६ रुपये दंड वसूल केला आहे.