ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी तयार करून त्याद्वारे संस्था स्थापन करून २४१ बँक खात्यामध्ये १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रुपयांची उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यातील काही रक्कम विदेशात पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पाच जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेसंजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमन, केदार उर्फ समीर दिघे, जितेंद्र पांडे, नविन व इतर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल आहे.
पेगेट इंडिया या ऑनलाईन पैसे देवाण घेवाण करणाऱ्या कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून त्याद्वारे कंपनीची २५ कोटी रुपयांना फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून महिन्यात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर कक्षा मार्फत सुरू होता. पोलिसांनी तपासा दरम्यान शेख इम्रान आणि रवी गुलानी या दोघांना अटक केली होती.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी २५ कोटी रुपयांपैकी १ कोटी ३९ लाख १९ हजार २६४ रुपये रियाल इंटरप्रायजेस या कंपनीच्या बँक खात्यात गेल्याचे समोर आले. पोलिसांनी रियाल इंटरप्रायजेसच्या वाशी आणि बेलापूर येथील कार्यालयांमध्ये तपासणी केली असता त्यात विविध बँकेचे खाते आणि करारनामे प्राप्त झाले. तसेच प्राप्त करारांपैकी काही करार ठाण्यात करण्यात आले होते. त्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भागीदार संस्था स्थापन केल्या. तसेच २४१ बँक खात्यातून १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रुपयांची उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आले आहे.