मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकिट तपासनीस मोहम्मद शम्स चंद पुन्हा एकदा चर्चेत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांनी आतापर्यंत १ कोटींचा दंड वसूल केला आहे. विनातिकिट प्रवास करणाऱ्या १० हजार ६८६ जणांविरोधात त्यांनी आतापर्यंत कारवाई केली आहे. चंद यांनी केलेल्या दंड वसुलीमुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला मोठा महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात चंद यांनी १.२५ कोटी रुपयांचा दंड गोळा केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा १ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०२३-२४ मध्ये मुंबई विभागात आतापर्यंत एकूण तीन टिसींनी १ कोटी दंड वसूल केला आहे. सुनील नैनानी यांनी १० हजार ४२८ जणांविरोधात कारवाई करत १ कोटी २ हजार ८३० रुपयांचा दंड गोळा केला आहे. तर एम. एम. शिंदे यांनी ११ हजार ३६७ जणांकडून १ कोटी १ लाख ३२ हजार ८७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. हे दोघेही वरिष्ठ तिकिट तपासनीस पदावर कार्यरत आहेत.
विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून कोटी रुपयांचा दंड वसूल करणाऱ्या तिकिट तपासनीसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे. त्यांच्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. यातून या कर्मचाऱ्यांची कामाप्रतीची निष्ठा दिसून येते. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे रेल्वेला मोठा फायदा होतो, अशा शब्दांत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यानं कोटींचा दंड वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. सर्व प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वेकडून सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. मध्य रेल्वेकडून नियमितपणे सर्व स्थानकांवर तिकिट तपासणी केली जाते. मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर, स्पेशल ट्रेन्समधून येणाऱ्या प्रवाशांची तिकिटं तपासली जातात, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. सर्व प्रवाशांनी तिकिट काढून प्रवास करावा आणि गैरसोय टाळावी, असं आवाहन त्यांनी केलं.