मुंबई : रेशन दुकानांमधून सरकारकडून मिळणाऱ्या मोफत धान्याच्या वाटप प्रक्रियेत आता आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी रेशन धान्य वाटपासाठी लाभार्थ्यांची ओळख प्रामुख्याने नावाच्या आधारे केली जात होती. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधार आधारित बायोमॅट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली आणि लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे जुळवल्यानंतरच धान्य दिले जाऊ लागले. मात्र, अनेकदा बोटांचे ठसे मशीनमध्ये योग्य प्रकारे नोंदवले जात नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः वृद्ध व्यक्तींचे बोटांचे ठसे फिकट झाल्याने किंवा हाताने सतत काम करणाऱ्या मजुरांच्या बोटांचे ठसे स्पष्ट न उमटल्याने धान्य मिळण्यात अडथळे निर्माण होत होते. या समस्येवर उपाय म्हणून आता सरकारने बायोमॅट्रिक पडताळणीसोबत चेहरा प्रमाणीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. UIDAI ने २९ सप्टेंबर २०२६ रोजी e-PDS प्रणालीसाठी चेहरा प्रमाणीकरण सुरू केले असून, ही नवीन व्यवस्था १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
सध्या रेशन दुकानांमध्ये e-POS मशीनच्या माध्यमातून आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी केली जाते. यामध्ये लाभार्थ्यांच्या बोटांच्या ठशांची ओळख पटवून धान्य वाटप केले जाते. मात्र, काही कारणांमुळे ठसे जुळले नाहीत तर प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. आता अशा परिस्थितीत चेहरा पडताळणीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. e-POS मशीन किंवा संबंधित प्रणाली लाभार्थ्याच्या चेहऱ्याची ओळख पटवून त्याची पडताळणी करणार आहे. UIDAI नुसार, चेहरा प्रमाणीकरण ही संपर्करहित आणि संमतीवर आधारित ओळख पटवण्याची पद्धत आहे. मात्र, यामुळे बोटांच्या ठशांची गरज पूर्णपणे संपणार नाही, तर चेहरा पडताळणी ही अतिरिक्त ओळख पद्धत म्हणून वापरली जाणार आहे. या सुविधेमुळे वृद्ध नागरिक, हातमजुरी करणारे कामगार आणि ज्यांना वारंवार बोटांचे ठसे जुळवताना अडचणी येतात, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, ही सुविधा संबंधित रेशन दुकानातील e-POS मशीन आणि e-PDS प्रणालीमध्ये उपलब्ध झाल्यानंतरच वापरता येणार आहे. प्रत्येक रेशन दुकानात ही सुविधा एकाच वेळी लागू होईलच असे नाही. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या e-PDS प्रणालीमध्ये चेहरा ओळख प्रणाली समाकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, भविष्यात रेशन धान्य वितरण प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि नागरिकांसाठी त्रासमुक्त होण्याची अपेक्षा आहे.




